शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची भूमिका 

मुंबई : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात कोणत्याही स्वरूपाची फौजदारी जबाबदारी निश्चित होत नसल्याचे स्पष्ट करून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांना निर्दोषत्व बहाल करण्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटली आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने भूमिकेत केलेल्या बदलाबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले तर भाजपने गेले पाच वर्षे राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी मोहिमच उघडली होती हे आता स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

निर्दोषत्व न्यायालयात टिकणे कठीण

अजित पवार यांच्या विरोधातील चौकशीच्या संदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आपल्याच आधीच्या प्रतिज्ञापत्राच्या नेमके विरोधी भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले हे एक आश्चर्यच मानावे लागेल. घोटाळ्यांचे आरोप झालेल्या ५० टक्के निविदांची अजून चौकशी पूर्ण झालेली नसताना अभय देण्यात आले आहे. न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र टिकणे कठीणच वाटते.

– देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

सिंचन घोटाळ्यात ढिगभर पुरावे असल्याची ओरड देवेंद्र फडणवीस व अन्य भाजप नेत्यांनी विरोधी पक्षात असताना केली होती. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपने याच मुद्दय़ावर जोरदार प्रचारही केला होता. सत्ताबदल झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले होते. पाच वर्षे फडणवीस हे मुख्यमंत्री होते. विरोधात असताना ढिगभर पुरावे सादर करणाऱ्या फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित होते. पाच वर्षे चौकशी होऊनही त्यातून काय निष्पन्न झाले हे समोर आले नाही. चौकशीत काही आढळले नसेल म्हणूनच बहुधा पुढील कारवाई झाली नसावी. मग ढिगभर पुराव्यांचे काय झाले? अजित पवार यांच्याबाबतचा अहवाल नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वी सादर करण्यात आला होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांच्या विरोधात पुरावे नसल्याचा अहवाल सादर केल्याने चौकशीत शासकीय यंत्रणेला तथ्य आढळले नसावे. भाजपचा अजूनही काही आक्षेप असल्यास न्यायालयात भाजप नेत्यांना लढा देता येऊ शकेल.

– डॉ. आमदार मनीषा कायंदे , प्रवक्त्या, शिवसेना

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या कामात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही हे आम्ही पूर्र्वीपासून सांगत होतो. मात्र भाजपने पाच वर्षे आमच्या विरोधात बदनामीची मोहीम उघडली. ती तथ्यहिन होती हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आलेले आहे.

–  जयंत पाटील, मंत्री व प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांत भ्रष्टाचार झालेला नाही हे २०१२ मध्ये चितळे समितीने सांगितले होते. तरीही सिंचन घोटाळ्याचे गाडीभरुन पुरावे आहेत, असे भाजप खोटे सांगत होते, हे आता समोर आले आहे. या विषयावर पाच वर्षे त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यांनी हीन दर्जाचे राजकारण केले. त्याबद्दल भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.

– सचिन सावंत, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस