राज्यात पक्षाची ताकद वाढल्याने विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला जास्त जागा मिळाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल, असे सूचक उद्गार भाजपचे मुंबई शहरअध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना काढले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री आमचाच असेल आणि जागावाटप पूर्वीप्रमाणेच होईल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रालोआच्या बैठकीनंतर मंगळवारी नवी दिल्लीत केले होते. या पाश्र्वभूमीवर शेलार यांनी ही भूमिका मांडली. लोकसभा निकालानंतर राज्यातील पक्ष पदाधिकारी, खासदार व नेत्यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. त्यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वाटय़ाला अधिक जागा मिळविण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला होता. विधानसभेसाठी शिवसेना १७१ तर भाजप ११७ जागा लढविते. या सूत्रामध्ये आता बदल व्हायला हवा, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेसचा पराभव करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या जागावाटपाचा कोणताही विषय नाही. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत त्यावर योग्य तो निर्णय होईल व तो अंतिम असेल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला जागावाटपात कोणताही बदल नको असून लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजप मात्र आता अधिक आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे आहेत. जागावाटपात भाजपला किमान १५० जागा मिळाव्यात, अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेनेचा बराच लाभ झाला व खासदार निवडून आले. याची जाण ठेऊन विधानसभेसाठी भाजपला अधिक जागा देण्यामध्ये त्यांनी आडकाठी करू नये, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.