उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शनिवारी भाजपने केली. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांशी मुख्यमंत्री हरीश रावत हे सौदा करीत असल्याची फीत प्रसारित झाल्याने त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे भाजपने म्हटले आहे. भाजपने याबाबत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना निवेदन दिले असून त्यामध्ये उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पॉल यांच्यावरही टीका केली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्दय़ावर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती.उत्तराखंडमधील काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांवर विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांनी पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत बजावलेल्या नोटिशींना उत्तर देण्याची मुदत शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्याने आणि या आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणीला मुख्यमंत्री हरीश रावत यांनी पाठिंबा दिल्याने या आमदारांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता आहे.

मुख्यमंत्र्यांवर लाचखोरीचा आरोप
उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी केला असून या प्रकाराचे स्टिंग केलेली व्हिडीओ फीत जारी केल्याने खळबळ माजली आहे. रावत यांनी मात्र ही फीत बनावट असल्याचे सांगून घोडेबाजार करीत असल्याच्या आरोपांचेही जोरदार खंडन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे घाणेरडे राजकारण सुरू झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे