उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून असून देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं निवेदन
“मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. ठाणे पोलीस तपास करत असून शवविच्छेदन करण्यात येत आहे,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. मनसुख हिरेन यांच्या मालकीची गाडी नव्हती असंही ते म्हणाले आहेत.

फडणवीसांची नाराजी
“मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचं म्हटलं आहे. गाडीचं स्टेअरिंग जॅम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का ? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही,” असं सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला.

यानंतर अनिल देशमुख यांनी ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नव्हती असं पुन्हा एकदा सांगत इंटिरिअरसाठी यांच्याकडे देण्यात आली होती, मात्र बिल थकल्याने गाडी ताब्यात ठेवण्यात आली होती असं सांगितलं. तसंच हात बांधण्यात आले नव्हते असं सांगत महाराष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं. फडणवीसांनी यावेळी पोलिसांच्या आणि गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचा आरोप केला. हे कोणाला वाचवण्यासाठी सुरु आहे ? अशी विचारणादेखील त्यांनी केली.

अनिल देशमुख यांनी यावेळी फडणवीसांना त्यांच्याकडे असणारी सर्व माहिती आपल्याकडे द्यावी अशी विनंती केली. पुढे बोलताना त्यांनी सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णब गोस्वामीला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचा राग आहे का त्यांच्यावर? अशी विचारणा केली. यावरुन विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केला असता अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांनी अन्वया नाईक प्रकरणी कारवाई केल्याचं सांगताना आपल्याकडे उपलब्ध सर्व माहिती द्यावी असं पुन्हा एकदा सांगितलं. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी आमच्या मनात शंका असल्याचं म्हटलं. गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं.

सुधीर मुनगंटीवार यांचा आक्षेप
“विधानसभेचं काही महत्व आहे की नाही. गृहमंत्र्यांनी शब्द मागे घ्यावे किंवा तुम्ही ते रेकॉर्डवरुन काढावे. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून त्याचं नाव घेतलं जाणं असं म्हणणं हे राजकीय, संविधानिक पाप आहे. नियमांचं पुस्तक पाहिलंत तर विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्रीपदाच्या तोडीस तोड मानलं जातं. इतकी महत्वाची माहिती दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी गांभीर्यानं उत्तर दिलं पाहिजे. एनआयएला चौकशी देण्यामागे कसली भीती आहे,” अशी विचारणा सुधीर मुनगंटीवर यांनी केली.