राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारले. यानंतर राजकीय वर्तुळात यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचं म्हटलं. तसंच शरद पवार यांनी सीबीआय चौकशीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं…हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“पण एक नक्की आहे की, त्यांनी सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नाही असं सांगितलं आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे गेले तीन-चार दिवस राष्ट्रवादीची पंचाईत झाली होती. चित्रपट अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी भाजपकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही दिली जात आहे. त्याच वेळी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले होते.