उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्रात अनिल देशमुख तसंच शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र गंभीर असून महाराष्ट्रात जे घडत आहे ते राज्याच्या आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

“महाराष्ट्राला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी मिळाल्या आहेत”; फडणवीसांचं ठाकरे सरकारला उत्तर

“सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र गंभीर असून त्यात लिहिलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात जे घडत आहे ते राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करायला सांगितलं असून पत्र वैगेरे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याची त्यांनी किंवा संबंधित यंत्रणेने चौकशी करावी. अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर त्यांसदर्भातील चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. नीट चौकशी होऊन सत्या बाहेर आलं पाहिजे. अन्यथ डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

संजय राऊतांची प्रतिक्रिया
“महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,” असं संजय राऊत बोलले आहेत.

“यामध्ये अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझा त्यांच्यावर विश्वास आहे,” असं संजय राऊत बोलले आहेत.

सचिन वाझेंच्या पत्रात काय?
सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र न्यायालयात सादर केले. ‘‘आपल्याला पोलीस दलात सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे दिली होती. मी पवार यांचे मतपरिवर्तन करतो, मात्र त्या बदल्यात दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी देशमुख यांनी केली. असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला. या वर्षी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. मंत्री परब यांनी ‘एसबीयुटी’च्या(सैफी बु-हाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. तसेच महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययू’कडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.