राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं आहे. अधिवेशनाच्या पूर्ण काळात गाजलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि त्यातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा कथित सहभाग या दोन मुद्द्यांवरून विरोधकांनी शेवटच्या दिवशी देखील सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “सचिन वाझे यांच्याकडे नक्कीच असं काहीतरी आहे की ज्यामुळे ते सरकार हलवूही शकतात आणि घालवूही शकतात”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, “मुख्यमंत्री हेच सचिन वाझेंसाठी वकील आहेत”, अशी देखील खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.

“संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो आणि सचिन वाझेंना वाचवलं जातं. संजय राठोड सरकार घालवू शकत नाहीत. पण एपीआय सचिन वाझेंकडे नक्कीच असं काहीतरी आहे की ते सरकारला हलवूही शकतात आणि सरकारला घालवूही शकतात”, असा आरोप फडणवीसांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी केली होती टीका

अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका मांडली. त्यामध्ये “सचिन वाझे काही ओसामा बिन लादेन नाही. आधी फाशी आणि नंतर तपास अशी पद्धत चालणार नाही”, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले होते. मात्र, त्याला देखील फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

“वाझेंना वकिलाची गरजच नाही!”

“माझं असं म्हणणंय की सचिन वाझेंना वकिलाची गरजच नाही. त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरा वकील नेमण्याची गरज नाही. त्यांच्याविरूद्ध इतके पुरावे आहेत, अशा व्यक्तीला मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन वाझेंकडे असे कोणते पुरावे आहेत? अशा कोणत्या गोष्टी आहेत? ज्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांना वाचवावं लागतं. सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाहीत हे आम्हालाही माहिती आहे. पण मुख्यमंत्र्यांचं या बाबतीतलं वागणं हे तुघलकी आहे”, अशी परखड टीका यावेळी फडणवीसांनी केली.

“मी सभागृहात सांगितलं आहे. माझ्याकडची कागदपत्र मी त्यांच्याकडे पाठवणारच आहे. त्याचा पाठपुरावा देखील करणार आहे. माझ्याकडे कागदपत्र कशी आली, याची चौकशी त्यांना करायची असेल, तर तीही चौकशी करायला माझी काहीही हरकत नाही”, या आपल्या भूमिकेचा देखील फडणवीसांनी यावेळी पुनरुच्चार केला.