प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : राष्ट्रीय नागरिक नोंदणीसारखे कायदे आणून समाजांत फूट पाडण्याचा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी दादर खोदादाद सर्कल येथे सुधारित नागरिकत्व कायदा व नागरिक नोंदणीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला.

या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, हे दोन्ही कायदे आणण्यामागे समाजात फूट पाडण्याचा भाजप व संघाचा डाव आहे. त्याविरोधात हे आंदोलन आहे. आमचे प्रश्न मांडले जात नाहीत व ते सोडवले जात नाहीत, त्यासाठी आम्हाला वेगळा संघर्ष करावा लागत आहे.

देशात कुठेही स्थानबद्धता छावण्या नाहीत, असे सांगणारे केंद्र सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. नवी मुंबईत खारघर व नेरुळ येथे दोन छावण्या तयार असून दोन लाख लोकांना तेथे ठेवण्यात येईल इतक्या त्या मोठय़ा आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. जे लोक  संविधानाला मानतात, फुले-आंबेडकरवादी आहेत, अशांना लक्ष्य केले जात आहे. मात्र रस्त्यावर उतरून त्याचा मुकाबला करू, असा इशारा आंबेडकर यांनी सरकारला दिला.