मुंबई : कर्नाटकात काँग्रेसची सत्ता गेली तरी, महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा पराभव मान्य नाही. विधानसभा निवडणूक निकालानंतर कोणत्या पक्षाला किती मतदान झाले, त्याची आकडेवारी समोर आली आहे. काँग्रेसला ३८ टक्के मतदान झाले आहे आणि भाजपला ३६ टक्के मतदान मिळाले आहे, त्यातून हा भाजपचा तांत्रिक विजय नाही, तर काँग्रेसच्या बाजूनेच जनादेश आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

अशोक चव्हाण हे कर्नाटकात पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते. साधारणत: मराठी भाषक भागात त्यांनी प्रचार केला होता. या भागातील खानापूर, बेळगाव ग्रामीण, कागवाड आणि बाभळेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याची माहिती त्यांनी दिली. सरकार स्थापनेच्या संदर्भात राज्यपालांनी निष्पक्षपाती भूमिका घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.