तामिळनाडूच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायलाच हवं, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला. तामिळनाडू ‘वंदे मातरम्’ अनिवार्य केलं असलं तरी त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्र विधानसभेत उमटू लागले आहेत. देश सोडून जावं लागलं तरी चालेल, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असं सांगून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विरोध दर्शवला होता. हाच मुद्दा भाजप आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत उपस्थित केला. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणावंच लागेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यावर अबू आझमी यांनी उत्तर दिलं. वंदे मातरम् इस्लामच्या विरोधात असल्याचं सांगून त्यांनी इतिहासातील काही दाखले दिले. देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अनेक सरदार मुस्लिम होते. त्यांचे वकीलही मुस्लिम होते. त्यामुळं आम्ही देशविरोधी असल्याचं पसरवू नका. सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा, हिंदुस्तान झिंदाबादचा नारा आम्ही हजारदा देऊ, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असं आझमी म्हणाले. त्यावर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आझमींना उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्याची लढाई ही वंदे मातरम् गातच लढली गेली. मग त्यावर तुमचा आक्षेप का? वंदे मातरम् म्हटलं तर त्यात चुकीच काय, असे प्रश्न त्यांनी विचारले. जिथे तुम्ही जन्माला आलात, येथे खाता-पिता, मृत्यूनंतर जमीन आणि कफनही इथला असतो. जिथे तुम्ही लहानाचे मोठे होता. मृत्यूनंतरही येथे अंत्यसंस्कार होणार असतील तर त्या मातीला वंदन करण्यात अडचण काय, असा सवालही त्यांनी केला. वंदे मातरम् गाऊ नका, असं कोणत्या धर्मात लिहिलं आहे हे दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलं. या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावंच लागेल, असंही खडसे यांनी ठणकावून सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp eknath khadse slams sp leader abu azmi over vande mataram in maharashtra vidhansabha
First published on: 28-07-2017 at 15:50 IST