News Flash

मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये आता भाजपची कसोटी!

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विरुद्ध ज्योतिरादित्य यांच्यातील रंगीत तालीम मानली जाते.

मध्य प्रदेशमधील भाजपच्या शिवराज सिंह मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार करण्यात आला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी तीन नव्या मंत्र्यांना शपथ दिली.

राजस्थानमधील पराभव, गुजरातमधील पीछेहाटीनंतर भाजप सावध

गुजरातमध्ये सत्ता कायम राखली असली तरी कमी झालेल्या जागा आणि दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील तिन्ही पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपची कसोटी लागणार आहे. यामुळेच भाजपने आधीपासूनच जोर लावला आहे. या दोन्ही जागा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या लोकसभा मतदारसंघातील असल्याने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विरुद्ध ज्योतिरादित्य यांच्यातील रंगीत तालीम मानली जाते.

राजस्थानबरोबरच मध्य प्रदेशातही या वर्षांअखेर विधानसभेची निवडणूक होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील लोकसभेच्या दोन, तर विधानसभेची एक अशा तिन्ही मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. या महिन्यात मध्य प्रदेशातील दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. आधीच चित्रकूट मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला होता. या दोन मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. यामुळेच गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व अन्य मंत्र्यांचे या मतदारसंघांतील दौरे वाढले आहेत. राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यास भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाल्याचा संदेश जाईल व भाजपसाठी आगामी निवडणुकींच्या दृष्टीने प्रतिकूल ठरू शकते.

मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होणारे दोन्ही मतदारसंघ हे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या गुणा लोकसभा मतदारसंघातील आहेत. गुणा मतदारसंघात सिंदिया यांची चांगली पकड आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व सिंदिया यांच्याकडेच सोपविले जाण्याची शक्यता आहे. सिंदिया यांच्याकडे नेतृत्व सोपविले गेल्यास विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विरुद्ध ज्योतिरादित्य सिंदिया असा सामना रंगण्याची शक्यता आहे. यामुळेच सिंदिया यांना आधीच शह देण्याकरिता त्यांच्या गुणा लोकसभा मतदारसंघात त्यांना धक्का देण्याची भाजपची योजना आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

शेतकरी वर्गातील नाराजीचा गुजरातमधील सौराष्ट्रात भाजपला फटका बसला. राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये शेतकरी वर्गाची नाराजी तसेच रजपूत समाजाचा विरोध कारणीभूत ठरला. मध्य प्रदेशातील शेतकरी वर्गात भाजप सरकारच्या विरुद्ध संतप्त भावना आहे. गेल्या वर्षी हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले होते. शेतकरी वर्गाची नाराजी दूर करण्याकरिता हमीभावाएवढा दर न मिळाल्यास तेवढी नुकसानभरपाई देण्याची योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे

महाराष्ट्रातही प्रतिष्ठा पणाला

* भंडारा-गोंदिया आणि पालघर, तर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिनिधित्व केलेल्या गोरखपूर तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रतिनिधित्व केलेल्या फुलपूर लोकसभा मतदारसंघांमध्येही लवकरच पोटनिवडणुका अपेक्षित आहेत.

* भाजपची सत्ता असलेल्या या दोन्ही राज्यांमधील जागा जिंकणे हे भाजपसाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 3:38 am

Web Title: bjp face litmus test in madhya pradesh bypoll
Next Stories
1 ‘संयमाचं तंत्र आता अवगत झालंय!’
2 प्रवेशाची शाळा पालकांचीही..
3 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन बदल्यांचे नवे धोरण
Just Now!
X