10 July 2020

News Flash

आघाडीची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला.

सावरकरांच्या गौरवाचा ठराव नाहीच!

मुंबई : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दरी निर्माण करण्याच्या उद्देशानेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचा गौरव करणारा ठराव मांडण्याचा भाजपचा प्रयत्न बुधवारी विधानसभेत यशस्वी झाला नाही. या मुद्दय़ावर महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करण्याची भाजपची योजना फोल ठरली.

सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा गौरव करणारा ठराव सुधीर मुनगंटीवार यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. सावरकर यांची  बदनामी करण्यात आल्याने ‘शिदोरी‘या मासिकावर बंदी घालावी आणि त्यांच्या गौरवाचा ठराव सभागृहाने एकमताने मंजूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांच्या पत्रांचे काय झाले, अजितदादांचा सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल साऱ्यांनाच आदर आहे. फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री असताना कधीही सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी असा ठराव मांडण्यात आला नव्हता याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले. तसेच सावरकर यांना ‘भारतरत्न‘ हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २० ऑगस्ट २०१८ आणि १७ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठविली होती. ही पत्रेच सभागृहात सादर करून फडणवीस यांच्या पत्रांचे काय झाले, असा सवाल अजितदादांनी केला.  सावरकर यांच्यासह महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत करावे म्हणून पत्रे लिहिली होती, असे फडणवीस यांनी सांगितले. मुनगंटीवार यांनी सादर केलेला ठराव हा नियमानुसार नाही आणि त्यांचे हेतू वेगळा वाटतो, असा आक्षेप अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. तर काँग्रेसच्या मासिकात काय लिहिले आहे हे वाचून फडणवीस यांनीच सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला.

सावरकर यांना काँग्रेसचा असलेला विरोध लक्षात घेता, काँग्रेसच्या आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी करून काँग्रेसच्या आमदारांना उचकविण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसच्या बाकावरून कोणीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

मुनगंटीवार यांचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी भाजपकडून केली जात होती. सावरकरांबद्दल शिवसेनेची भूमिका बदलली का, असा सवाल फडणवीस यांनी केला. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. तेव्हा मुनगंटीवार यांना ठराव मांडण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. गोंधळातच पाच शासकीय विधेयके मंजूर करण्यात आली.

विधान परिषदेतही सावरकर यांच्या गौरवाचा ठराव मांडण्याची भाजपची योजना होती. पण मराठी भाषा सक्तीचे विधेयक चर्चेला असल्याने भाजपने हे विधेयक मंजूर झाल्यावर ठराव मांडण्याची योजना आखली होती. विधेयक मंजूर होताच दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने सावरकर यांच्या गौरवाचा ठराव मांडण्यास भाजपला संधीच मिळाली नाही.

विधानसभेत ठराव मांडू दिला जाणार नाही याचा अंदाज येताच भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत बसकण मारली. यानंतर भाजप सदस्यांनी अभिरुप विधानसभा सुरू केली. गोंधळात सत्ताधाऱ्यांकडून पाच विधेयके मंजूर करण्यात येत असतानाच भाजप नेत्यांची सावरकर यांच्या गौरवाची भाषणे सुरू होती. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांचे वंशज मात्र वेगळी भूमिका घेत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 4:14 am

Web Title: bjp fail to divide maha vikas aghadi government over savarkar issue zws 70
Next Stories
1 ‘त्या’औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घाला
2 सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची
3 आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त
Just Now!
X