झटपट आघाडीनंतर बहुमत मिळविण्यात भाजपला अपयश

मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दक्षिण दिग्विजयाचा विजयोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी मंत्रालयाजवळील भाजपच्या प्रदेश कार्यालयात सारे सज्जच होते. सुरुवातीच्या टप्प्यानंतर भाजप १०० पेक्षा अधिक जागांवर पुढे असल्याचा कल येताच भाजपच्या जल्लोषात रंग भरू लागला. दुपारी साडेअकराच्या आसपास भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे कल आल्यावर जल्लोषाचा स्वर गगनाला भिडला खरा पण काही वेळानंतर भाजप १०५ च्या आसपास अडकल्याचे समोर आल्यावर साऱ्या उत्सवावर चिंतेचे सावट पसरले आणि हळूहळू भाजपच्या नेत्यांनी विजयोत्सव आटोपता घेतला.

कर्नाटकातील निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार या माध्यमांच्या मतदानोत्तर कल चाचणीचा कौल खोटा ठरणार आणि पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असा विश्वास असल्याने प्रदेश भाजपच्या कार्यालयापासून ते जवळील चौकापर्यंत पक्षाचे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. बुधवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर आरंभीच्या काही तासांतच भाजप १०० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे समोर येताच भाजपच्या विजयोत्सवात रंग भरू लागला. ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना लाडू-पेढे भरवले जात होते. अकरा-साडेअकराच्या सुमारास भाजपला कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे समोर आले. भाजप ११५ ते १२० जागांवर आघाडीवर असल्याचे विविध वृत्तवाहिन्यांवर झळकू लागताच दक्षिण दिग्विजयाचे द्वार पुन्हा एकदा कर्नाटकने खुले केले या आनंदात विजयोत्सव टीपेला पोहोचला. कर्नाटकमधील विजयामुळे भाजपचे दक्षिणेचे दार उघडले असून आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असेही दानवे म्हणाले. भाजपाच्या प्रचारासाठी आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नांदेडमधील अनेक कार्यकर्ते कर्नाटकमध्ये गेले होते. या विजयात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा  मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांची दांडी

कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रावसाहेब दानवे यांच्यासह दुपारी एकच्या सुमारास पक्षाच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी प्रदेश मुख्यालयात येणार असल्याचा संदेश भाजपतर्फे माध्यमांना पाठवण्यात आला. मात्र एकच्या सुमारासच स्पष्ट बहुमतापासून भाजप दूर राहिल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश कार्यालयातील उत्सवास दांडी मारली. नंतर मुख्यमंत्री हे राष्ट्रपतींसह एका कार्यक्रमात असल्याने प्रदेश कार्यालयात येणे शक्य नव्हते अशी सारवासारव करण्यात येत होती.

१ )  मोदींची जादू कायम : मोदी यांची जादू अजून कायम असल्याचे कर्नाटकातील निवडणुकीत स्पष्ट झाले असून, काँग्रेसकडे त्यांना उत्तर देण्यासाठी कुठलाच पर्याय नाही. एप्रिलमध्ये काही जनमत चाचण्यांत काँग्रेसला आघाडी दाखवण्यात आली, तर काहींनी भाजपला बहुमतासाठी काही जागा कमी पडतील असे सांगितले, पण मे महिन्यात मोदी प्रचारात उतरले. त्यांनी रोज चार सभा घेतल्या. एका मागोमाग एक काँग्रेसवर ते आरोप करीत गेले. त्यांनी एकटय़ाच्या बळावर भाजपला आघाडी मिळवून दिली.

२) राहुल गांधी अपयशी : राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरही त्यांना कर्नाटक च्या निवडणुकीत छाप पाडता आली नाही. कर्नाटकात त्यांनी सौम्य हिंदुत्वाची भूमिका घेत मंदिर व मठांना भेटी दिल्या, पण त्याचे त्यांना कुठलेच फळ मिळाले नाही. कागद न घेता पंधरा मिनिटे बोलून दाखवण्याचे मोदींचे आव्हान राहुल यांनी स्वीकारले नाही, त्यामुळे मतदारांत त्यांना अनुकूलता मिळवता आली नाही. इच्छुक नसलेला राजकारणी ही त्यांची प्रतिमा थोडी बदलली असली तरी मोदी यांच्या करिष्म्याचा मुकाबला करण्यासाठी राहुल यांना बरीच मेहनत करावी लागेल.

३ ) भाजप विरुद्ध काँग्रेस : काँग्रेसच्या ताब्यात आता दोनच राज्ये आहेत. मोदी यांनी एकेक राज्ये  पादाक्रांत केली असून, काँग्रेसने मध्य प्रदेश व राजस्थानात काही पोटनिवडणुका जिंकून आशेचा किरण दाखवला होता, पण कर्नाटकात तसे काही घडले नाही. काँग्रेसला कौल मिळाला नाही. काँग्रेसने भाजपविरोधात केवळ पंजाबमध्ये बाजी मारली.

४ ) काँग्रेसकडे निधीची चणचण : काँग्रेस आता सत्तेवर नाही त्यामुळे त्याचा फटका म्हणून त्यांच्याकडचा निधी संपत चालला आहे. अनेक राज्यांत सत्ता गमावल्याने काँग्रेसची ही स्थिती झाली असताना कर्नाटकवर आशा टिकून होत्या. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यात काँग्रेसला निधी मिळू नये यासाठी कर्नाटकची निवडणूकजिंकण्याचा चंग भाजपने बांधला होता. कर्नाटक हा काँग्रेसचा उरलासुरला पैशाचा स्रोत होता.

५ ) मूळ मुद्दे बाजूला : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादाचे ढोल बडवले. सिद्धरामय्या यांनी लिंगायत व इतर प्रादेशिक प्रश्न प्रचारात आणले. भाजपची लिंगायत मते फोडण्यासाठी लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस केली. कावेरी पाणीवाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पंतप्रधान मोदी यांनी पालन केले नाही असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. कावेरी प्रश्न हा ध्रुवीकरण करेल असे वाटले होते, पण तसे दिसले नाही. दक्षिण कर्नाटकात जनता दल धर्मनिरपेक्षच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.