राज्यातील पाटबंधारे विकास महामंडळातील आणि जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराची सीबीआयकडून फौजदारी चौकशी करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांविरुध्द यासंदर्भात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याबाबतही विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजपने जोरदार लावून धरल्याने र्सवकष चौकशी करण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात जाहीर केले होते. त्यानुसार डॉ. माधवराव चितळे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तावडे यांना काही कागदपत्रे व पुरावे समितीसमोर सादर करायचे होते. पण आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार कार्यकक्षेत नसल्याचे चितळे यांनी तावडे यांच्याकडे स्पष्ट केले. त्यामुळे आता उच्च न्यायालयातील याचिकांमध्ये सहभागी होऊन सीबीआय चौकशीची मागणी न्यायालयाकडेच केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.