अन्य पक्षांमधील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे नुकसानच झाले, असा दावा शुक्रवारी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भरतीमुळे पक्षाची ताकद वाढण्यास मदतच झाल्याची भूमिका शनिवारी घेतल्याने पक्षातच या मुद्दय़ावर गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले.
भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, पक्षाच्या आकुर्डी येथील बैठकीत आपण केलेल्या भाषणाचा माध्यमांनी विपर्यास केला. विविध पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना त्या त्या पक्षांची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षाची कार्यपद्धती समजून सांगावी, असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मी सांगितले होते. पण माझ्या या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या नेत्यांचा पक्षाला उपयोगच झाला आहे. पक्षाच्या बळकटीमध्ये त्यांचे योगदान आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय कोअर कमिटीने विचारपूर्वक आणि एकमताने घेतला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अभिमानच आहे, असा दावाही पाटील यांनी केला. यावेळी माजी मंत्री विनोद तावडे आणि आशीष शेलार उपस्थित होते.
अन्य राजकीय पक्ष एखादा नेता किंवा घराण्याचे असतात. पण भाजप हा कार्यकर्त्यांंचा पक्ष आहे. भाजपची कार्यपद्धती इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. येथे विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात. पक्षाची ही कार्यपद्धती जुन्या कार्यकर्त्यांनी नव्यांना सांगावी अशी सूचना आपण कार्यकर्त्यांना केली असून पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी पक्षाची कार्यपद्धती अंगीकारल्याचा दावाही पाटील यांनी यावेळी केला.
पक्षाच्या आकुर्डी येथे झालेल्या बैठकीत आपण केलेल्या भाषणाचा माध्यमांनी विपर्यास केला. विविध पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना त्या त्या पक्षांची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षाची कार्यपद्धती समजून सांगावी, असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले होते. माध्यमांकडून त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2020 1:27 am