मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची खेळी

राज्याचे नेतृत्व प्रस्थापित जातींकडे सोपविण्याची काँग्रेस पक्षाची परंपरा भाजपने मोडीत काढून आतापर्यंत सत्ता मिळालेल्या बहुसंख्य राज्यांमध्ये मुख्यमंत्री नेमताना प्रस्थापित जातींना दूर ठेवण्याची पाडलेली प्रथा भाजपने गुजरातमध्ये कायम ठेवली असली तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र त्याला अपवाद करण्यात आला आहे.

भाजपने राज्याचे नेतृत्व सोपविताना प्रस्थापित जातींना संधी नाकारली. महाराष्ट्रात मराठा, हरयाणात जाट, झारखंडमध्ये आदिवासी, गुजरातमध्ये पटेल अशा प्रस्थापित जातींकडे नेतृत्व सोपविण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयाणात बनिया, झारखंडमध्ये बिगर आदिवासी, उत्तर प्रदेशात आठ टक्के लोकसंख्या असलेले ठाकूर या जातींच्या नेत्यांकडे नेतृत्व सोपविण्यात आले. गुजरातमध्येही प्रस्थापित पटेल समाजाकडे नेतृत्व सोपविण्याचे टाळून जैन समाजातील विजय रुपाणी यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. वास्तविक गुजरातमध्ये जैन समाज फक्त पाच टक्क्य़ांच्या आसपास आहे. पटेल समाजाची नाराजी लक्षात घेता नितीन पटेल यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अशी दोन पदे निर्माण केली जात नाहीत. पण गुजरातमध्ये पटेल समाजाला खुश करण्याकरिताच उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्यात आले होते. लागोपाठ सहाव्यांदा सत्ता मिळाल्यावर भाजपने हे पद नव्या सरकारमध्येही कायम ठेवले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये मात्र रजपूत या प्रस्थापित समाजाच्या जयराम ठाकूर यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात येणार आहे. हिमाचलमध्ये रजपूत आणि ब्राह्मण या दोन जातींचे प्राबल्य आहे. पक्षाने येथे प्रस्थापित जातीकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा निर्णय घेतला. कारण या समाजाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. याशिवाय मंडी या डोंगराळ भागाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. गेल्या वर्षी उत्तराखंडमध्येही ठाकूर या प्रस्थापित जातीच्या त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याकडे भाजपने मुख्यमंत्रीपद सोपविले आहे. उत्तराखंडच्या राजकारणात ठाकूर आणि ब्राह्मण समाजाचे प्राबल्य लक्षात घेता तसा निर्णय घेण्यात आला होता.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ या ठाकूर समाजातील नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. वास्तविक ठाकूर समाज हा फक्त आठ टक्क्य़ांच्या आसपास आहे. उत्तर प्रदेशात हिंदुत्व हा भाजपच्या राजकारणाचा गाभा असल्याने हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या आदित्यनाथ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

कर्नाटकात भाजपने प्रस्थापित लिंगायत समाजातील येडियुरप्पा हाच आगामी निवडणुकीत पक्षाचा चेहरा असेल, असे जाहीर केले आहे.