‘काँग्रेसमुक्त भारत’चे भाजपचे स्वप्न असले तरी राज्यात झालेल्या तीन टप्प्यांतील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला काँग्रेसनेच आव्हान दिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष तुलनेत मागे पडले. काँग्रेसची वाढ होणे हे भविष्यातील निवडणुकांकरिता भाजपला त्रासदायक ठरू शकते.

नगरपालिका निवडणुकांच्या निकालांवरून राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज बांधता येत नसला तरी राजकीय कल सूचित होतो. लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने विजयाची परंपरा कायम राखली. साधारणपणे राज्यातील सत्तेतील पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळते, असा राज्यातील कल यंदाही कायम राखला गेला. नगरपालिका निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पध्र्यामध्येच लढत झाली आहे. भाजप पहिल्या क्रमांकावर तर काँग्रेसने दुसरे स्थान पटकविले आहे. या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मागे पडले.

उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात काँग्रेसचे आव्हान उभे राहणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरिता त्रासदायक ठरणार आहे. काँग्रेसच्या जागा वाढल्यास आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपचे गणित बिघडू शकते. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने राज्यात येऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे गुणगान गात असतात. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद वाढणे हे भाजपच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे.

भाजपला मराठवाडा वगळता सर्व भागांमध्ये चांगले यश मिळाले. काँग्रेसला विदर्भ वगळता अन्यत्र चांगल्या जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला राज्यात जेव्हा जेव्हा सत्ता मिळाली तेव्हा विदर्भाची ताकद महत्त्वाची होती. १९७८ मध्ये जनता लाटेत झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात सर्वाधिक जागा इंदिरा काँग्रेसला मिळाल्या होत्या. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळण्यात विदर्भाचा वाटा मोठा होता.

विदर्भात भाजपला एकतर्फी यश का मिळते, याचा आढावा काँग्रेसचे नेते घेत आहेत

भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पातळीवरील पक्षांमध्ये महाराष्ट्रात स्पर्धा होत आहे हा चांगला कल आहे. प्रादेशिक पक्ष पुढे आल्यास राष्ट्रीय स्तरावर सारे गणित बिघडते हे देशाने अनुभवले आहे. कारण प्रादेशिक पक्ष आपलाच कार्यक्रम राबवितात. कोणत्याही पक्षाला नव्याने सत्ता मिळाल्यावर पहिले दोन-अडीच वर्षे नागरिकांना त्याचे अप्रूप असते. पण हे यश हळूहळू कमी होत जाते. भाजपची वाटचाल त्याच मार्गाने सुरू झाली आहे.

आमदार अनंत गाडगीळ, प्रवक्ते, काँग्रेस.