एकनाथ खडसे यांची टोलेबाजी
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेशी जमवून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी, विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्याने भाजपचा फायदाच झाला, असे सांगत सोमवारी शिवसेनेच्या शेपटावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दुर्दैवाने युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत युती तोडण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेनेच्या नेतृत्वाला ही माहिती कोणी द्यायची हा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा ही हिम्मत मी दाखविली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून युती तुटल्याचा निरोप दिला होता, असे खडसे यांनी सांगितले.
आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूप्रमाणेच शिवसेनेबरोबरील युती तुटली हा प्रसंग आपल्या आयुष्यातील दुर्दैवी होता, अशी कबुली खडसे यांनी दिली.
मात्र युती तुटल्याने भाजपचा फायदाच झाला, असा टोला त्यांनी शिवसेनेला उद्देशून मारला. स्वतंत्रपणे लढल्याने कोणाची किती ताकद आहे याचा अंदाज आला, असेही त्यांनी सांगितले.
शाकाहारी-मांसाहारी वादात हस्तक्षेप नाही
जैन धर्मीयांच्या सणाच्या काळात आठ दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ठरावाला शिवसेनेने विरोध केला आहे. याकडे खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करायचा नाही हे सरकारचे धोरण आहे. यामुळे महापालिकेने कोणता ठराव केला याच्याशी राज्य शासनाचा संबंध नाही, असे सांगत खडसे यांनी या वादात पडण्याचे टाळले.