|| मधु कांबळे

राष्ट्रपुरुषांच्या यादीत नाव चुकून राहिले : फडणवीस

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाचा यथोचित गौरव करावा, अशी मागणी केली जात आहे, मात्र राज्य सरकारकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही अजून त्यांना स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडावा म्हणून आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि गेली पाच वर्षे सत्ता भोगलेल्या भाजपलाही त्यांचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करण्याचा विसर पडला होता, हेही उघड झाले आहे.

भाजप-शिवसेनेची युती असताना दोन्ही पक्ष सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याची मागणी करीत होते. शिवसेनेने आता भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली आहे. काँग्रेसचा सावरकरांना विरोध आहे, हे जगजाहीर आहे. अशा पक्षाबरोबर युती करणाऱ्या शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी भाजपने केली. सावरकर यांची बुधवारी २६ फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्याचे औचित्य साधून भाजपने विधिमंडळात सावरकर यांच्या गौरवाचा ठराव मांडावा तसेच तो मंजूर करावा, अशी मागणी करून आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या मागणीवरून दोन्ही सभागृहांमध्ये बराच गोंधळ झाला. सत्ताधारी आघाडीने ठराव तर मांडला नाहीच, परंतु गोंधळातही दिवसभराचे कामकाज उरकून घेऊन, भाजपलाही चांगलाच धक्का दिला.

 

या संदर्भात माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकर यांचे नाव असायलाच पाहिजे, असे ते म्हणाले. परंतु यादीत त्यांचे नाव नाही हे निदर्शनास आणल्यानंतर चुकून राहिले असेल, तर ती चूक या सरकारने ताबडतोब दुरुस्त करावी, अशी मागणी करीत, सावरकर यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत असायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

छायाचित्रही नाही..

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाकडून राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यांची जी यादी जाहीर होते, त्यांची मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये छायाचित्रे लावली जातात. शासकीय कार्यालयांमध्ये या यादीतील छायाचित्रे लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषांच्या यादीत नाव नसलेल्या सावरकरांच्या छायाचित्रांना शासकीय कार्यालयांच्या भिंतीवरही स्थान नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावे, विधिमंडळात त्यांच्या गौरवाचा ठराव मांडावा अशी सध्या भाजपकडून जोरदार मागणी केली जात असली, तरी भाजपच्या सत्ताकाळातही सावरकर यांचा  राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही, अशी माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारकडून वेळोवेळी राष्ट्रपुरुष-थोरपुरुष यांची यादी जाहीर केली जाते. महात्मा गांधी यांच्यापासून ते विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा समावेश असलेली अद्ययावत यादी ११ सप्टेंबर २०१७ रोजी जाहीर करण्यात आली. या आधीच्या आणि अद्ययावत यादीतही सावरकर यांचे नाव नाही.

राष्ट्रपुरुषांची यादी..

महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, दादाभाई नौरोजी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉ. एस. राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, महात्मा जोतिबा फुले, डॉ. झाकिर हुसेन, फक्रुद्दीन अली अहमद, व्ही.व्ही. गिरी, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, के.आर. नारायणन,

अटलबिहारी वाजपेयी, राजर्षी शाहू महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. मनमोहन सिंग, प्रतिभा पाटील,  प्रणब मुखर्जी, नरेंद्र मोदी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, रामनाथ कोविंद राष्ट्रपुरुषांच्या यादीत सावरकर यांचे नाव असायलाच पाहिजे. आमच्या सरकारच्या कालावधीत चुकून राहिले असेल, तर ती चूक या सरकारने ताबडतोब दुरुस्त करावी. – देवेंद्र फडणवीस