25 October 2020

News Flash

सत्तापालटानंतर इतिहासाच्या पुस्तकात नवे बदल?

नवी अभ्यास मंडळे नेमून अगदी चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाठय़पुस्तके बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला.

नववीच्या पुस्तकांतून आणीबाणी, बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख वगळण्याची शक्यता

मुंबई : भाजप शासनाच्या काळात तयार करण्यात आलेल्या नववीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकांत काँग्रेसला त्रासदायक ठरलेला बोफोर्स घोटाळा, आणीबाणीचा उल्लेख सध्या अभ्यासमंडळांमध्ये चर्चेचा विषय आहे. ‘नवे शासन, नवी अभ्यासमंडळे, नवी पुस्तके’ हे समीकरण कायम ठेवत ‘विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका’ असे दोनच दिवसांपूर्वी सांगणाऱ्या शिक्षणमंत्री या पुस्तकांत बदल करण्याचे आदेश देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप शासनाच्या काळात पहिली ते बारावीपर्यंत सर्व इयत्तांसाठी एकच अभ्यासक्रम मंडळ नेमण्याचा निर्णय घेऊन मंडळांवरील आधीच्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. नवी अभ्यास मंडळे नेमून अगदी चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाठय़पुस्तके बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला. त्यामध्ये सातवी, नववीची इतिहासाची पुस्तकेही बदलली. या पुस्तकांत ‘भारत : १९६० नंतरच्या घडामोडी’ या पाठात काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातील कथित बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘संरक्षण सामग्री आणि विशेषत: बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफांच्या खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर (राजीव गांधी) बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा त्याकाळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला’ असा उल्लेख या पुस्तकांत आहे. आणीबाणीचाही उल्लेख या पुस्तकांमध्ये आहे. पुस्तकांतील हे उल्लेख पुस्तक प्रकाशित झाल्यावर काहीच दिवसांत समोर आले आणि हे पुस्तक वादग्रस्त ठरले. पुस्तकावर देण्यात आलेल्या क्यूआर कोडला जोडण्यात आलेली संकेतस्थळेही वादग्रस्त ठरली.

आतापर्यंत स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास विद्यार्थी शिकले. मात्र आता स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडींची ओळख पाठय़पुस्तकांतून करून देण्यात आली आहे,’ अशी भूमिका भाजपने घेतली. काँग्रेसने पुस्तकातील उल्लेख काढून टाकावे या मागणीसाठी आंदोलनेकेली. मात्र, त्यानंतर पुस्तकाची प्रत अधिप्रमाणित करतानाही हे उल्लेख काढून टाकण्यात आले नाहीत. त्यामुळे गेले दोन वर्षे विद्यार्थी या घडामोडींचा अभ्यास करत आहेत. मात्र, आता सत्तापालटानंतर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी काँग्रेसकडे आली आहे. काँग्रेससाठी कायम दुखरी बाजू ठरलेल्या आणीबाणी आणि बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपांचे उल्लेख पुस्तकांतून काढून टाकण्यात येणार का? वाजपेयी शासनाच्या काळात कारगील युद्धात भारताने विजय मिळवला, इतपत माफक उल्लेखासह संपलेल्या पुस्तकांत आता त्यावेळी झालेले वाद, गैरप्रकारांचे आरोप याचा उल्लेख करण्यात येणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नवे शासन, नवी मंडळे

  • बालभारतीच्या सध्याच्या अभ्यास मंडळांवरील काही नियुक्त्या रद्द करून नवी अभ्यासमंडळे नेमण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत.
  • मंडळातील काही सदस्यांनी राजीनामाही दिला आहे. मंडळातील सदस्यांची माहिती काही दिवसांपूर्वी बालभारतीकडून शासनाने घेतली होती.
  • या पार्श्वभूमीवर नवे शासन, नवी अभ्यासमंडळे हे समीकरण कायम राहणार असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 2:09 am

Web Title: bjp government power change government possibility of excluding the mention of the emergency bofors scandal akp 94
Next Stories
1 गॅस गीझरमुळे गुदमरून मुलीचा मृत्यू
2 टॅक्सींवरील इंडिकेटरला संघटनांचा विरोध
3 मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम
Just Now!
X