अशोक चव्हाण यांची टीका

केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य अधोगतीला गेले आहे, या राज्यात शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, कुणीच समाधानी नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे टिळक भवनात महाराष्ट्र दिनानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारने महाराष्ट्राच्या व्यापक हिताचा एकही निर्णय घेतला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकारने नोटाबंदी, जीएसटी लागू केल्यामुळे त्याचा त्रास व्यापारी वर्गापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घटकांना सहन करावा लागत आहे. उद्योग व व्यापार संकटात सापडल्याने त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकारची धोरणेही सर्वसामान्यांच्या हिताची नाहीत. भाजप सरकारच्या काळात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली असून राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून समाजात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. केंद्रातले आणि राज्यातले सरकार जनहितासाठी काम करण्याऐवजी दोन-चार उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करीत आहे, असे ते म्हणाले.

नाणारविरोधात आज सभा

स्थानिकांचा विरोध असताना त्यांच्यावर कोणताही प्रकल्प लादण्यास काँग्रेसचा विरोध आहे, अशी भूमिका घेऊन, कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बुधवारी पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई आदी पदाधिकारी उद्या नाणारला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.