कोणाचा पक्षप्रवेश होणार याची उत्सुकता

महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोपाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने उद्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या वेळी अन्य पक्षांमधील नेत्यांचे पक्षप्रवेश होतील, असे जाहीर करण्यात आले असले तरी राष्ट्रवादीचे राणा जगतसिंह पाटील यांच्यासह दोन-तीन नेत्यांचेच प्रवेश होणार आहेत. सोलापूरमधील नेत्यांचे भाजप प्रवेशावरून तळ्यात-मळ्यात सुरू होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप उद्या सोलापूरमध्ये होत आहे. या वेळी पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या जाहीर सभेत मोठय़ा प्रमाणावर पक्ष प्रवेश होतील, असे भाजपने आधी जाहीर केले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय राणे यांच्या पक्षाला भाजपची द्वारे खुली केली जाणार नाहीत. ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यावरच राणे यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीचा  राजीनामा दिलेले आमदार राणा जगतसिंह पाटील, काँग्रेसचे माणचे माजी आमदार जयकुमार गोरे यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील विरोधी पक्षाचे दोन आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असली तरी त्यांचा प्रवेशही लांबणीवर पडला आहे.  कारण या दोन आमदारांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेसचे एक माजी मंत्रीही पक्षप्रवेश करणार अशी चर्चा होती, पण या नेत्याने थांबा आणि वाट पाहा, अशी भूमिका घेतली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश निश्चित असला तरी हा प्रवेश नवी दिल्लीत पुढील आठवडय़ात केला जाण्याची शक्यता आहे.