संतोष प्रधान

शिवसेनेपुढे युतीसाठी आर्जव

विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपचे नुकसान होते हे उत्तर प्रदेश, कर्नाटकमधील निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाल्यानेच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सत्ताधारी भाजपने धसका घेतला असून, शिवसेनेपुढे युतीसाठी सातत्याने हात पुढे केला जात आहे.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला आहे. आघाडीसाठी जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शेजारील कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे दोन पक्ष एकत्र आल्याने पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातही मताधिक्य घटले. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने सत्ताधारी भाजपची डाळ शिजली नव्हती. लोकसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. महाराष्ट्रातील गोंदिया-भंडारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपचा पराभव केला होता. वास्तविक विदर्भात भाजपने चांगली पकड निर्माण केली असताना आणि विरोधकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतानाही राष्ट्रवादीच्या कुकडे यांनी भाजपचा पराभव केला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये समन्वय साधला गेल्याने भाजपचा पराभव झाला होता.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बसपा, समाजवादी पार्टी, डावे पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा विविध समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही आघाडीत सहभागी व्हावे, असा प्रयत्न असला तरी आंबेडकर यांच्या सहभागाबाबत दोन्ही काँग्रेस नेते साशंक आहेत. सर्व समविचारी पक्षांची महाआघाडी अस्तित्वात आल्यास भाजपला अधिकच कठीण जाईल, असे काँग्रेसचे गणित आहे.

मतांचे गणित..

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार हे जवळपास निश्चित असल्याने भाजपचे नेते सावध झाले आहेत. कारण काँग्रेस व राष्ट्रवादीला साधारणपणे राज्यात ३५ ते ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळतात. गेल्या वेळी दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हाही काँग्रेस १८.१० टक्के तर राष्ट्रवादीला १७.९६ टक्के मते मिळाली होती. २००४ आणि २००९ मध्ये ४० टक्के मतांच्या आधारे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने राज्याची सत्ता काबीज केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत असताना भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास भाजपला फटका बसू शकतो. आघाडीची शक्यता निर्माण झाली असताना भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. गेल्या निवडणुकीत भाजपला ३१ टक्के तर शिवसेनेला २० टक्के मते मिळाली होती. भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास होणारी मतांची फाटाफूट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते.