पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात तीन जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे जिंकून भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानली जातेच, पण काँग्रेसचा पायाही या भागात हळूहळू ठिसूळ होऊ लागला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांना स्थान मिळाले नव्हते, पण भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीतील बडे नेते गळाला लावूनच प्रवेश मिळविला आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे मिळविण्यात भाजपला यश मिळाले. सोलापूरमध्ये भाजपने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोराला अध्यक्षपद मिळाले असले तरी राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही भाजपने तेथे केलेली खेळी यशस्वी ठरली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेली दोन वर्षे सहकारातील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्याकरिता प्रयत्न केले. चंद्रकांतदादांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याच्या अन्य भागांमध्ये भाजप आणि शिवसेनेने परस्परांवर कुरघोडी करण्याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादीला मदत केली. पण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्य़ांमध्ये शिवसेनेने भाजपला साथ दिली. शिवसेनेला बरोबर ठेवण्यात चंद्रकांत पाटील यांना यश आले.

पद्धतशीर व्यूहरचना

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत शिवसेना किंवा भाजप या दोन्ही पक्षांना प्रवेश करता आला नव्हता. पण राज्याची सत्ता येताच भाजपने पद्धतशीरपणे जोर लावला. राष्ट्रवादीने आतापर्यंत मोठय़ा जमीनदारांचे हित बघितले होते. भाजपने छोटय़ा शेतकऱ्यांना आपलेसे केले. त्याचा पक्षाला फायदा झाल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात यश मिळविण्यासाठी गेले वर्षभर पद्धतशीरपणे यंत्रणा राबविली. सांगली हा राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करीत भाजपने पहिला धक्का दिला. नगरपालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला रोखले. आता जिल्हा परिषद ताब्यात घेतली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर नाराजी होती. सरकारच्या माध्यमातून विविध कामे केल्याने त्याचा फायदा झाल्याचे सांगली भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशमुख हे राष्ट्रवादीतून भाजपवासी झाले होते.

सोलापूरमध्ये प्रस्थ असलेल्या मोहिते-पाटील यांच्या घरात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने भांडणे लावली. मोहिते-पाटील यांचे प्रस्थ कमी करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले. विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा तसेच जिल्हा परिषदही राष्ट्रवादीला गमवावी लागली. सोलापूरच्या ग्रामीण भागात एकेकाळी शरद पवार यांचे शब्द अंतिम समजला जात असे. त्याच सोलापूरमध्ये पक्षाला फटका बसला. कोल्हापूरमध्ये काँग्रेस अंतर्गत लाथाळ्या, राष्ट्रवादीतही रुसवे-फुगवे व याबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादीतील कटुता या साऱ्यांचा फायदा चंद्रकांत पाटील यांना उठविला.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वा राष्ट्रवादीतील ताकदवान पण पक्षात कोंडी होत असलेल्या नेत्यांना भाजपने गळाला लावले. या साऱ्यांचा फायदा भाजपला झाला आहे. राष्ट्रवादीची पुणे आणि सातारा या दोन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता राहिली आहे.