21 February 2019

News Flash

काँग्रेसपेक्षा भाजप वाईट : राज ठाकरे

पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. महागाईने लोक त्रस्तच नव्हे तर होरपळून निघत आहे.

राज ठाकरे

मुंबई : पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. महागाईने लोक त्रस्तच नव्हे तर होरपळून निघत आहे. मात्र केवळ निवडणूक जिंकणे एवढाच भाजपचा एकमेव जाहीरनामा आहे. त्यांना लोकांशी काहीही देणेघेणे नाही. भाजप काँग्रेसपेक्षा वाईट पक्ष आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली. देशाचा पंतप्रधान हा राजा असावा, व्यापारी नसावा अशी टिप्पणीही त्यांनी केली.

बंदनंतर कृष्णकुंज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण केवळ दरवाढीविरोधात बंदमध्ये सामील झाल्याचे सांगत राज यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेला कोणतीच भूमिका नसून केसाळ कुत्र्यासारखे हे नेमके कुठून वळतात तेच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. पैशाची कामे असली की सत्तेतून बाहेर पडण्याच्या बाता मारतात आणि काम झाले की गप्प बसतात, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली.

मोदी सरकार लुटत आहे.. 

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील नरेंद्र मोदी यांची विरोधी पक्षात असतानाची वक्तव्ये एकदा तपासून पाहा, असे सांगून राज म्हणाले, मोदींची नोटबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणीही फसली आहे. देश आज खड्डय़ात गेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ करून लोकांना लुटण्याचे काम मोदी सरकार करत आहे.

अजूनही अभ्यास!

राजस्थानमध्ये तेथील सरकारने  मूल्यवर्धित कर कमी करून दर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजून केवळ अभ्यासच करत आहेत. खोटे आकडे सांगण्यात भाजपला मजा वाटते. सतत खोटी आकडेवारी सांगितली जाते, असे राज म्हणाले.

First Published on September 11, 2018 4:25 am

Web Title: bjp is worse than congress says raj thackeray