लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक गड सर करीत भाजपने राज्यातील काँग्रेसचे एकापाठोपाठ एक बालेकिल्ले काबीज केले असून, पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या वर्चस्वक्षेत्रात आधीच यश मिळविले आहे. मुंबई आणि मराठवाडा या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या पारंपरिक प्रभावक्षेत्रांमध्ये भाजपने हातपाय पसरले आहेत.

लातूर जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवून भाजपने काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात काँग्रेसला गारद केले. काँग्रेसच्या विविध भागांतील बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून मुसंडी मारली आहे. विदर्भ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. १९७८ मध्ये जनता लाटेत झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला यश मिळाले होते. तेव्हा इंदिरा काँग्रेसचे ६२ आमदार निवडून आले होते व त्यापैकी ५०च्या आसपास आमदार हे विदर्भातून निवडून आले होते. १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी विभागणी झाल्यावरही पुढील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळण्यात विदर्भाचा मोठा वाटा होता, कारण काँग्रेसच्या एकूण आमदारांमध्ये विदर्भाचा वाटा हा एक तृतीयांशपेक्षा जास्त होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून विदर्भात भाजपची हवा तयार झाली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांचा अपवाद वगळता भाजपला एकहाती यश मिळत गेले. विदर्भात अमरावती वगळता काँग्रेसची पीछेहाटच झाली आहे. नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. देशातील निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी या नंदुरबारमधून करीत. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्ये झाली होती. अशा या नंदुरबारमध्ये काँग्रेसचा गेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा भाजपने पराभव केला. आता तर सांगलीची जिल्हा परिषदही भाजपने जिंकली आहे. शिवसेनेच्या विरोधात अमराठी माणसांना मुंबईत काँग्रेसचा पर्याय होता. त्यातून काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळायचे. १९९९, २००४ आणि २००९ च्या निवडणुकांमध्ये मुंबईने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला साथ दिली होती. आता मात्र या मुंबईत शिवसेनेच्या वर्चस्वाला भाजपने शह दिला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड, राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामुळे नगर जिल्ह्य़ांमध्ये काँग्रेस सुस्थितीत आहे. नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये यश मिळवून दिले असले तरी राणे यांच्याकडे काँग्रेसमध्येच संशयाने बघितले जाते.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही फटका

पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने निवडणुकांमध्ये यश मिळविले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्ता मिळाली. पुणे आणि सातारा वगळता राष्ट्रवादीची अन्यत्र पीछेहाटच झाली. मुंबई आणि मराठवाडय़ावर शिवसेनेची भिस्त होती; पण या दोन्ही विभागांमध्ये भाजपने शिवसेनेपुढे आव्हान उभे केले आहे. मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीचे यश भाजपने संपादित केले. परभणी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला जास्त जागा मिळाल्या.