राज्यासह देशभरात करोनाचा प्रसार आणि प्रचार हळूहळू कमी व्हायला लागला आहे. करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सर्व स्तरावरील प्रशासनाकडून केला जात आहे. ब्रिटनहून आलेल्या व्हायरसच्या प्रकारामुळे शाळा, कॉलेजेस सुरू करण्याचे निर्णय लांबणीवर टाकले जात आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाच्या रूग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाल्याचं चित्र आहे, पण अद्याप करोनावर ताबा मिळवण्यात प्रशासन यशस्वी झालेले नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद आहेत. मुंबई लोकल अद्याप पूर्ववत सुरू करण्यात आलेली नाही. अशातच मुंबई पालिकेने करोनासंदर्भातील उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडून ४०० कोटींचा अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पालिकेसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘शिवशाही’ कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर; फोटो ट्विट करत भाजपा नेता म्हणाला…

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मुंबई पालिकेचे करोनावर ६ महिन्यात १६०० कोटी रुपये खर्च (झाले) तरी अजून ४०० कोटी हवे असे पालिका म्हणतेय.. पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाही? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले? ४०० कोटी रुपये मागणीच्या प्रस्ताव परत पाठवा अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली. तो शिवसेनेने नामंजूर का केला? का लपवाछपवी करताय? हिशेब द्या! मुंबईकर करोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी करोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले?”, असे आरोप शेलार यांनी केले आहेत.

आशिष शेलार यांनी व्हिडीओही ट्विट केला आहे. त्यात वरळी मतदारसंघात करोनाकाळात विशेष निधी का देण्यात आला असा सवाल त्यांनी केला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कुटुंबीयांनाच सॅनिटायर पुरवण्याचं कंत्राट देण्यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच, १६०० कोटींचा निधी नक्की कसा खर्च केला? याचाही हिशेब त्यांनी मागितला आहे.