मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते आशिष शेलार यांची आज भेट झाली. या भेटीमध्ये ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या मोर्चाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसेने हिंदुत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे भाजपाशी त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेटही झाली. या भेटीमध्ये ९ फेब्रुवारीच्या मनसेच्या मोर्चाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट ९ फेब्रुवारीच्या मनसेच्या मोर्चाबाबत होती अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांची महत्त्वांची बैठक बोलवली होती. या बैठकीत ९ तारखेला न भुतो, न भविष्यती असा मोर्चा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकला अशी मागणी राज ठाकरे यांनी त्यांच्या २३ जानेवारीच्या अधिवेशनात केली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारीला मोर्चाला मोर्चाने उत्तर देणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. या मोर्चानंतर राज ठाकरे यांचा उल्लेख नवे हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला. मात्र आपल्या नावापुढे हे बिरुद लावू नका. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच होते. दुसरं कोणीही ते बिरुद लावू शकत नाही त्यामुळे मला असं म्हणून नका असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आता आज राज ठाकरे आणि आशिष शेलार या दोन नेत्यांची भेट झाली. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र या दोन नेत्यांमध्ये ९ तारखेच्या मोर्चाबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.