मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करणाऱ्या पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना ही ‘हेरिटेज सफर’ करता येणार आहे. या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी मागील वर्षात पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या निर्णयावरून व कर्ज रोख्यांच्या मुद्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“एकीकडे हेरिटेज वॉक सुरु करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत… दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला “बाजारात” उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच..नीट काळजी घेताय ना? कर्ज रोखेच विकताय ना? ७/१२ वर मालक मुंबईकरच राहणार ना?” असं शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

एकीकडे उत्पन्नात घट झालेली असताना, करोना काळात अमाप खर्च झाल्याने मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. यात भर म्हणजे, अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्याने आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभारण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. यावरून शेलार यांनी टीका केल्याचे दिसून येत आहे.

पालिकेला केवळ ४० टक्के उत्पन्न!

दरम्यान, सर्वात श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचा येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार आहे. करोनामुळे पालिकेचा खर्च वाढला असून टाळेबंदीमुळे उत्पन्न घसरले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील किती निधी खर्च झाला आणि किती उत्पन्न जमा झाले याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पण त्याचबरोबर पुढील वर्षीचा अर्थसंकल्प कसा असेल, याबाबतही उत्सुकता सर्वांना आहे.