मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करताना शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी दाखविलेली बेजबाबदारी चर्चेचा विषय ठरत आहे. लक्षणानुसार करोनाची औषधे कधी आणि कशी घ्यावीत याची जाहिरातबाजी पक्षाच्या काही नगरसेवकांनी समाजमाध्यमांवर केली. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेणे धोकायदायक असून त्याची अशा रीतीने जाहिरात करणे चुकीचे असल्याचे नोंदवित ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेनेच्या नगरसेवकांनी नागरिकांना ‘कंपांउडर’कडूनच औषधं घेण्यास प्रोत्साहित करू नये,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

“मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माधुरी भोईर, संजना घाडी आणि सुजाता पाटेकर या शिवसेना नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला न घेता ‘कंपाउंडर’कडून औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची जाहिरात केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला.
“या जाहिरातीद्वारे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला असून जर यात नमूद केलेली कोणतीही औषधं कोणी घेतली आणि काही दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असेल,” असा सवालही त्यांनी केला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

काय आहे प्रकरण ?

शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करणाऱ्या जाहिराती समाजमाध्यमावर प्रसारित केल्या आहेत. यात करोनावरील लक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केलेल्या औषधांची यादी जाहीर केली आहे. जीवनसत्त्व क, ड यांसह हायड्रोक्सीक्लोरोक्विन ही औषधे सर्वांनी घ्यावीत, असे नमूद केले असून दिवस आणि प्रमाणही लिहिले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डेक्सोना गोळी पाच दिवस घ्यावी, असे यात म्हटले आहे. यांसह ताप, सर्दी, घसादुखी असल्यास घ्यावयाची औषधेही लिहिली आहेत.
अतिउत्साहात तयार केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे गरजेचे आहे. यात दिलेल्या औषधांचे प्रमाणही चुकीचे आहे. अशा रीतीने जाहिरात केल्यास कोणत्याही सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल आणि याचे व्यापक दुष्परिणाम होऊ शकतात. या औषधांची जाहिरात करणे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याने या जाहिराती मागे घेण्याची मागणी ‘आयएमए’ने केली आहे. मुंबईचे माजी महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांच्यासह माधुरी भोईर, संजना घाडी, सुजाता पाटेकर आदी नगरसेवकांनी या प्रकारची जाहिरातबाजी के ल्याची तक्रार आहे.

नगरसेवकांचे घूमजाव

माझ्या वैयक्तिक साहाय्यकाने ती जाहिरात तयार करून फेसबुकवर प्रसिद्ध केली होती. माझ्या लक्षात आल्यावर जाहिरात काढून टाकल्याचे माजी महापौर आणि नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वार यांनी सांगितले. माजी महापौरांसह अन्य नगरसेवकांनी केलेल्या जाहिरातींचे अनुकरण करत जाहिरात तयार केली. यात औषधांची माहिती नमूद केली असून याचा वापर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करावा, असा उद्देश नव्हता. समाजमाध्यमांवरून जाहिरात काढून टाकल्याची माहिती नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी दिली.

डॉक्टरांचे वैयक्तिक संपर्क क्रमांकही प्रदर्शित

काही नगरसेवकांनी जाहिरातीत मोठ्या करोना रुग्णालयांना मार्गदर्शन करणाऱ्या खासगी डॉक्टरांचे वैयक्तिक संपर्क क्रमांकही प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाही याचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी मांडले आहे.