मुंबई शहर आणि उपनगरे हा खूप मोठा विभाग आहे. अशा वेळी मुंबई महापालिकेसारख्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी दोन आयुक्त असावेत अशी मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. या मागणीनंतर, हा मुंबईच्या विभाजनाचा डाव असल्याचा आरोप भाजपाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आला. महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच अस्लम शेख यांनी भाजपाच्या नेत्यांना धारेवर धरलं. जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी आणि दोन पालकमंत्री असू शकतात, तर मग इतक्या मोठ्या शहरासाठी दोन आयुक्त का नसावेत? असा सवाल त्यांनी भाजपाला केला.
भंडारा प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात?”; भाजपाचा ठाकरे सरकारला सवाल
“मागील दहा वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येला पायाभूत सोयीसुविधा पुरवताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे असल्या कारणाने मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तास अन् तास प्रवास करावा लागतो. मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सुलभ व्हावं यासाठी जर मुंबई उपनगरासाठी व शहरसाठी स्वतंत्र जिल्हाधिकारी असणे जनतेच्या फायद्याचेच आहे”, असे शेख म्हणाले.
भंडारा अग्नितांडव प्रकारानंतर ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…
“नागरिकांच्या समस्येचं निराकरण करण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी दोन पालकमंत्री असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्याला भाजपा नेत्यांचा विरोध का? दोन जिल्हाधिकारी व दोन पालकमंत्र्यांमुळे जर मुंबईचे विभाजन होत नसेल तर मुंबईसाठी दोन आयुक्त नेमणे हा मुंबई विभाजनाचा डाव कसा काय ठरु शकतो?”, असा प्रश्न अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांपुढे उपस्थित केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 5:33 pm