गुरुवारची पहाट कोकणासाठी दहशतीची ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यानंतर हळूहळू चिपळूण शहरात पूर्णपणे पाणी भरलं.  एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृध्द महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आहे. तर अनेकजण पाण्यात बुडाल्याचे वृत्त आहे. दरम्यान चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री आहेत”, अशी संतापजनक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

चिपळूणमध्ये दीड हजार जणांची सुटका

चिपळूणमध्ये गुरुवारी आलेल्या महापुरात अडकलेल्या नागरिकांपैकी सुमारे दीड हजार नागरिकांची शुक्रवारी दिवसभरात सुटका करण्यात आली. मात्र अजूनही काही ठिकाणी नागरिक अडकले असण्याची  आहे. महापुराचे पाणी चिपळूण शहरात गुरुवारी पहाटेपासून शिरू लागले.  दुपारपर्यंत शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला.  पूर्वानुभवानुसार नागरिकांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलवले होते. मात्र पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचल्याने भयावह स्थिती निर्माण झाली.  या परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे असंख्य नागरिक आपापल्या घरात किंवा दुकानांमध्ये अडकून पडले होते.

‘एसटी’च्या टपावर नऊ तास..!

चिपळूणला पुराचा वेढा पडल्यानंतर त्यातून एसटीचे आगाराही सुटू शकले नाही. पाणी वाढण्याचा धोका पाहता अनेक गाड्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे, आगारातील सामान सुरक्षित स्थळी हलवणे इत्यादी कामे पार पाडताना पाण्याची पातळी बघता बघता वाढली आणि एसटीच्या सात कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर नऊ तास काढावे लागले.  नऊ तासांनी  त्यांची पोलिसांनी सुटका केली. या पुरात चिपळूण आगाराचेही मोठे नुकसान झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh criticizes anil parab over the floods situation in chiplun srk
First published on: 24-07-2021 at 11:20 IST