गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेतेमंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत काही मतं व्यक्त करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की मनसेने जर परप्रांतियांबद्दल असलेली द्वेषाची भूमिका बाजूला ठेवली तर आम्ही त्यांना सोबत घेऊ. त्यानंतर नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनसेचं हिंदुत्वप्रेम आणि मराठीप्रेम मान्य आहे पण त्याचा अर्थ अमराठी नागरिकांचा विरोध असा होऊ शकत नाही. त्यांच्या या मुद्द्यावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी एक सूचक वक्तव्य केलं.

“मिळालेला मंत्रीपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडूंची लाचारी”

“मनसेच्या मराठीपणाचा अर्थ हा खूपच व्यापक आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. राज्यातील नोकऱ्यांमध्ये मराठी लोकांना प्राधान्य, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर आणि मराठी संस्कृतीचे पालन असा मनसेच्या मराठीपणाचा अर्थ आहे. मराठीपण बाजूला ठेवण्याचा विषयच उद्धवत नाही. पण मनसेच्या मराठीपणाचा व्यापक अर्थ कोणाच्या लक्षात आला नसेल, तर यावर नक्कीच चर्चा केली जाऊ शकते. तसेच अमराठी नागरिकांना मारहाण किंवा तत्सम प्रकाराबाबत मनसेचं नाव घेतलं जात असेल तर हा मुद्दाही चुकीचा आहे. या मुद्द्यावरही चर्चा करण्यास मनसे तयार आहे”, असं सूचक वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी टीव्हीनाइनशी बोलताना केलं.

मनसेच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. त्यावरही सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे हे आमच्या पक्षाच्या भूमिका वेळोवेळी ठरवत असतात. त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिकेचं जर कोणी स्वागत करत असेल तर आम्हीही त्यांचे स्वागतच करू”, असे ते म्हणाले.

झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा!

“अमराठी लोकांचा आमचा पक्ष द्वेष करतो ही चुकीची समजूत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोकांनी मराठी माणसं, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांचा जर आदर केला, तर त्यांना आमचा विरोध होणार नाही. ते अनादराची वर्तणूक करतात तेव्हा आम्ही विरोधाची भूमिका घेतो. केवळ विरोधाला विरोध किंवा अमराठीला विरोध अशी ठोकळेबाज भूमिका आमच्या पक्षाची नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केलं.