मुलुंड येथील मॅरेथॉन अव्हेन्यू येथे तानसा पाईपलाईनवर ओव्हर ब्रीज बांधण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. परिसरातील हजारो नागरिकांनी आक्षेप घेऊनही केवळ एका बिल्डरच्या आणि महापालिकेच्या कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सोमय्या यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे.

सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, “या ओव्हर ब्रीजसाठी आवश्यक तो प्रोजेक्ट रिपोर्ट पालिकेने बनविलेला नाही. हा ब्रीज लोकांसाठी किती उपयोगात येईल? याचा वाहतुकीवर कोणता परिणाम होईल? याचा कोणताच उल्लेख महापालिकेकडून करण्यात आलेला नाही. या ओव्हरब्रीजबाबत जनतेकडून हरकती मागविण्यात आलेल्या नाहीत. या ब्रीजला स्थानिक नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला होता, मात्र त्याकडेही साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.”

“पाईपलाईनच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या जमीन मालकाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१९मध्ये मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात या ब्रीजचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तरीही अशा प्रकारची कामे सुरू आहे”, असेही किरीट सोमय्या यांनी तक्रारीत नमूद केले.