मनसे आणि भाजपा समविचारी पक्ष आहेत, असं वक्तव्य भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. भविष्यात काहीही अशक्य नसल्याचं ते म्हणाले.

“मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये हरकत घेण्यासारखं काहीही नाही. आमच्या मित्रपक्षाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे,” असं महाजन यावेळी म्हणाले. मनसेने झेंड्याची काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. “राज्यात विषम विचारी पक्ष एकत्र आले आहेत. तर मग आम्ही समविचारी आहोत,” असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

“सध्या मतभेद असले तरी भविष्यात आमची मतं जुळली तर काही अशक्य नाही. आम्ही एकत्र आलो तर लोकांनाही ते आवडेल. मनसे आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच मताचे आहेत,” असं महाजन यांनी स्पष्ट केलं. गुरूवारी मनसेच्या महाअधिवेशनादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं.

मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते. पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.