रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने मुंबईत ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. महिलेचा पती रिक्षातून घेऊन रुग्णालयांमध्ये धावधाव करत होता. पण चार रुग्णालयांनी करोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सायन रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं असून मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.

सुषमा भेलेकर असं या महिलेचं नाव आहे. किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा यांचे पती अनिल रविवारी त्यांना रिक्षातून मिठागर, सावरकर आणि डॉ आंबेडकर हॉस्पिटलला गेले होते. पण रुग्णालयांनी करोना रिपोर्ट नसल्याने त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर रात्री ८ वाजता त्यांना सायन रुग्णालयाने दाखल करुन घेतलं. यावेळी डॉक्टरांनी करोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं घोषित केलं. सुषमा भेलेकर आपल्या कुटुंबासोबत भांडूप गावात वास्तव्यास होत्या.

किरीट सोमय्या यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. सोबतच सुषमा यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? अशी विचारणा केली आहे.

याबाबत महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, ”सदरहू ४३ वर्षीय महिला रुग्णाला  २० जुलै २०२० रोजी सायंकाळी ६.४५ वाजता गंभीर अवस्थेत महापालिकेच्या ‘लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णायल’ येथे आणण्यात आले. सदर रुग्णाची परिस्थिती लक्षात घेत त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांचे प्राणवायू पातळी (Oxygen level) ही ३५ टक्के असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांना ऑक्सीजन देण्यास देखील सुरुवात करण्यात आली. सदर रुग्णाच्या एक्स रे मध्ये त्यांना न्युमोनिया असल्याचे निदर्शनास येण्यासह रुग्णास श्वास घेण्यास मोठा त्रास होत होता. सदर रुग्णाची ‘कोविड ऍन्टिजेन’ चाचणी ही ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर त्यांना सायंकाळी ७.४० च्या सुमारास वॉर्ड क्र. १६ मध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर सदर रुग्णास वैद्यकीय उपचारक्रमानुसार inj PIPTAZ, inj MPS, inj HEPARIN, inj PAN, T ivermectin, Cap doxy इत्यादी देण्यात आले. यानुसार आवश्यक ते सर्व औषधोपचार तात्काळ करण्यात आले. तथापि, सदर रुग्णाचे रात्री १० वाजताच्या सुमारास दुर्दैवी निधन झाले.”

“रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात आल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचारक्रमानुसार (Medical Protocol) तात्काळ आवश्यक ते औषधोपचार सुरु करण्यात आले होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.