महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चौकशीची मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अंमलबजावणी संचलनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिले आहे. शिवसेनेने प्रत्येकी ३ कोटी रुपये देऊन मनसेचे नगरसेवक फोडल्याचा आरोप सोमय्या यांनी शुक्रवारी केला होता. आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. दिलीप लांडे, अर्चना भालेराव, स्नेहल मोरे, दत्ता नरवणकर, परशुराम कदम आणि अश्विनी माटेकर यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत प्रवेश केला. मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी जोरदार तोंडसुख घेतले होते. माफियांच्या माध्यमातून आलेल्या पैशाने शिवसेनेने नगरसेवकांची खरेदी केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे केली आहे. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला असून तसा उल्लेखही त्यांनी अंमलबजावणी संचलनालयाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.

मनसेचे सहा नगरसेवक आणि पुष्पक बुलियन या मुंबईतील कंपनीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कंपनीचे संचालक चंद्रकांत पटेल सध्या अटकेत आहेत. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या नोटांच्या माध्यमातून सोने खरेदी करताना पटेल यांना २२ सप्टेंबरला अटक झाली. मनसेचे नगरसेवक शिवसेनेत दाखल होताच सोमय्या यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती. माफियांकडून आलेल्या पैशांमधून शिवसेनेने प्रत्येकी ३ कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

मुंबई महापालिकेत मनसेचे एकूण सात नगरसेवक होते. यातील सहाजणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेचा फक्त एक नगरसेवक सध्या महापालिकेत आहे. या एका नगरसेवकानेही त्याला पैशांची ऑफर देण्यात आल्याचे म्हटले होते, असेही सोमय्यांनी अंमलबजावणी संचलनालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी बोलताना मनसेचा प्रत्येक नगरसेवक ५ कोटींना विकला गेला, असा आरोप खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केला आहे.