राज्यात करोनाची भीती पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असून, मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रार्थनास्थळं सुरू केल्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा केला होता. “दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली,” असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

“सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत,” असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

काय म्हणाल्या होत्या महापौर ?

“दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. करोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल,” अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली होती. “लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे. शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही त्या म्हणाल्या होत्या.

“लोकल ट्रेन सुरु झाल्यास करोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तुर्तास रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. या सगळ्यावरून एक-दोन टक्के लोक उगीचच कांगावा करत आहेत. त्यांना बोलू द्या, आम्हाला फरक पडत नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. बाकी सगळं नंतर पाहू,” अशी भूमिका मांडत किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.