News Flash

‘शिवभोजना’च्या अटींवरून निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

राज्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात येणार आहे.

१० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयात शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसंच या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ मूद भात आणि १ वाटी वरण देण्यात येणार आहे. परंतु या थाळीसाठी काही अटी शर्थींचं पालनही करावं लागणार आहे. यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

या अटी बघूनच भूक मरेल. शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा. सरळ हाताने काय मिळेल अशी अपेक्षा या सरकार कडून कुणी करू नये, अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळ्या मिळणार आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगराला मिळून १९५० थाळ्या मिळणार आहेत.

आणखी वाचा – दहा रूपयात शिवभोजन मिळणार; अटी आणि शर्थी लागू

काय आहेत अटी शर्थी ?
हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असणार असून भोजनालयं केवळ दुपारी १२ ते २ या कालावधीतच कार्यरत राहणार आहेत.

सदर भोजनालयात दुपारी १२ ते २ या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल. यासाठी भोजनालय चालवण्यासाठी सदर मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी.

सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.

भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.

यासंदर्भात राज्य शासनानं एक जीआर काढला आहे. सध्या राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. तसंच शहरी भागांमध्ये प्रतिथाळी ५० रूपये तर ग्रामीण भागांमध्ये प्रतिथाळी ३५ रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. शहरी भागांमध्ये २ चपात्यांसाठी १० रूपये, १ वाटी भाजीसाठी २० रूपये, १ वाटी वरणासाठी १० रूपये आणि१ मूद भातासाठी १० रूपये असे एकूण ५० रूपये ठरवण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात पुरवण्यात येणाऱ्या थाळीबद्दल मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 1:39 pm

Web Title: bjp leader nilesh rane criticize shiv sena uddhav thackeray over 10 rupees shiv bhojan maharashtra government jud 87
Next Stories
1 २०२२ पर्यंत इंदू मिलमधील स्मारकाचं काम पूर्ण करणार – अजित पवार
2 शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांना सापडले पाय, गूढ अद्यापही कायम
3 वडील मुख्यमंत्री तर पुत्र मंत्री ही राज्यांतील सहावी जोडी
Just Now!
X