काही दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे यांनी सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ती घटना ताजी असतानाच आज (सोमवार) पुन्हा एकदा त्यांनी केईएम रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. केईएम रुग्णालयातही मृतदेहांच्या शेजारी उपचार सुरू असल्याचा तो व्हिडीओ असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. यानंतर त्यांनी ट्विट करत पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.
आज सकाळी सात वाजता केईएम रुग्णालयात घेण्यात आलेला हा व्हिडीओ असल्याचं राणे यांनी सांगितलं आहे. “मुंबई महानगरपालिकेला आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा करायची नाही. मृतदेहांशेजारीच आपण उपचार घेण्याची सवय करून घ्यावी असं पालिकेला वाटत आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी ट्विटरवरून मुंबई महानगरपालिकेवर टीका केली आहे. “अशा परिस्थितीत काम करावं लागत असेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत वाईट वाटत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
यापूर्वी राणे यांनी सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला होता.. रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णावर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानंही त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 11:59 am