तीन पायाच्या महाविकास आघाडी सरकारचा कारभार अजून पूर्णपणे सुरूही झालेला नाही. खातेवाटप झालेले नाही. असे असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही हे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यातून महाविकास आघाडी सरकार, विशेषतः शिवसेनेतील नाराजी आणि मतभेद उघड झाले आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मुळात कॉंग्रेस सोडून सत्तेसाठी शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा दावा सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला होता. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात घेऊन सेनेने त्यांची नैतिकता कुठल्या पातळीवर नेऊन ठेवली, हे दाखवून दिले होते, असं दरेकर यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी सरकार हे अंतर्गत नाराजीतूनच अडचणीत येईल आणि त्याची सुरुवात झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

महाविकास आघाडीचं खुर्चीवर लक्ष : मुनगंटीवार
महाविकास आघाडीचं लक्ष केवळ खुर्चीवर आहे. खातेवाटपावरूनही महाविकास आघाडीत भांडण सुरू होतं, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी सत्तेसाठी कोणतेही निर्णय घेत सरकार स्थापन केलं त्या ठिकाणी असंच होणार, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, आज दिवसभरात अशा अनेक बातम्या मिळतील असं सूचक वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं.