News Flash

“दारु घरपोच मिळतेय पण शेतकऱ्याचा भाजीपाला नाही, महाराष्ट्राला आपण कुठे घेऊन चाललोय?”

"प्रत्येकाला स्वत:ची जीवाची काळजी आहे. लोकांची अशी मानसिकता आहे की..."

प्रातिनिधिक फोटो

आम्ही घरपोच दारु पोहचवू शकतो पण शेतकऱ्याचा भाजीपाला पोहचवू शकत नाही असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील महाविकास आघाडीला आपण हा महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत असा प्रश्न विचारला आहे. राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत अशी मागणी करत भाजपाने आज राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं केली आहे. मुंबईमध्येही सिद्धीविनायक मंदिरासमोर दरेकर यांच्याबरोबरच भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला.

नक्की वाचा >> “…तर माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून जनतेवर का जबाबदारी टाकता?”; मुख्यमंत्र्यांना भाजपा नेत्याचा सवाल

महाराष्ट्रामध्ये बार आणि वाईन शॉप सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली मंदिरं मात्र बंद आहेत असा टोला दरेकर यांनी लगावला.  “दुर्दैव असं आहे की वाईन शॉप, बार सुरु होत आहे. मात्र कोवीडच्या या परिस्थितीमध्ये जिथे जाऊन आम्ही नतमस्तक होतो, जिथे जाऊन मनाला शांती मिळेल ती मंदिरं उघडायची नाहीत. म्हणजे घरपोच आम्ही शेतकऱ्याचा भाजीपाला पोहचवू शकत नाही पण दारु त्या ठिकाणी पोहचवू शकतो. कुठे हा महाराष्ट्र आपण घेऊन चाललोय?,” असा सवाल दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

करोनाच्या कालावधीमध्ये सुरक्षित राहण्याची जबाबदारी सर्वांची असली तरी मंदिरांवर अनेकांची उपजिविका आधारित आहे हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे असंही दरेकर म्हणाले. “जबाबादरी सर्वांवर आहे. प्रत्येकाला स्वत:ची जीवाची काळजी आहे. लोकांची अशी मानसिकता आहे की करोनाने आपण मरणारच आहोत. मात्र करोनापेक्षा अधिक महाभयानक आर्थिक त्रेधात्रिपट उडाली आहे त्याचं काय. इंडस्ट्री बंद होत आहेत, व्यवसाय बंद होत आहेत तर खायचं काय आम्ही. करोनाबरोबरच आम्ही उपासमारीने पण मरायचं आहे का? अशा वेळेस मधला मार्ग काढून ज्याप्रमाणे हॉटेलचे नियम लावले, जीमचे नियम लावतोय तसे मंदिराचे आपण नियम लावूयात. मंदिरांवर आधारित अनेकांची उपजिविका आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे,” असं मत दरेकर यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’; भाजपाचे सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन

भाजपाचे नेत प्रसाद लाड यांनीही महिन्याभरापूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं अशी आठवण करुन देत सरकारने दडपशाहीची भूमिका घेतल्यास आम्हीच तितक्याच जोमाने विरोध करु असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:23 pm

Web Title: bjp leader pravin darekar slams state government over covid 19 rules scsg 91
Next Stories
1 माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना उत्तर
2 बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल
3 छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत पंतप्रधान मोदींचं मराठीत भाषण
Just Now!
X