शिवसेना आणि भाजपाचे रक्त एकच आहे. आमच्यात हिंदुत्वाचा समान दुवा असल्यामुळे पुन्हा युती झाली असल्याचे भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना सर्व मुद्दे समजावून सांगितले, त्यांना ते पटलेही. त्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. युती तुटली नव्हती आणि भविष्यात तुटणारही नाही. तात्विक सहमती होणे आवश्यक होते. आमच्यात मतभेद होते. मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण असते, असेही ते म्हणाले.

युतीबाबत दोलायमान परिस्थिती निर्माण झाली होती. युती झाल्यानंतर विरोधकांसह सोशल मीडियावर युतीची खिल्ली उडवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

आमच्यात यापूर्वीही मतभेद होते. पण गेल्या चार-साडेचार वर्षांत हे मतभेद जाहीरपणे सांगितले जाऊ लागले. मतभेद होते पण मनभेद नव्हते, हेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे भवितव्य अंधारात आले म्हणून एकत्र आलेलो नाहीत. सोनिया गांधी विदेशी आहेत म्हणून काँग्रेस सोडून शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. पण नंतर पवारांना त्या स्वदेशी वाटल्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

राममंदिराची त्वरीत उभारणी करण्याची शिवसेनेची मागणी होती. आम्ही त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. उद्धव ठाकरे यांना ते पटले. नाणारबाबतही त्यांना मुद्दे पटवून दिल्याचे ते म्हणाले.

सोशल मीडियावर युतीबाबत खिल्ली उडवली जात असल्याचा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, सोशल मीडियापेक्षा सर्वसामान्य माणूस काय म्हणतो हे महत्वाचे आहे. जे मत व्यक्त करत असतील त्याचे प्रमाण किती हेही पाहावे लागेल. पण युती झाल्यामुळे कोणीच नाराज नाही. उलट जनतेसह सर्वच जणांना याचा आनंद झाला आहे.

जागा वाटपांबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस ठरवतील. विधानसभा निवडणुकीला आणखी खूप वेळ आहे. लोकसभेतील निकालानंतर अनेक समीकरणे बदलतील. त्यामुळे त्यावर आता मत व्यक्त करणे योग्य नाही. पण घटकपक्षांना जागा सोडल्यानंतर ज्या जागा उरतील त्या आम्ही निम्म्या निम्म्या घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यावर ते म्हणाले की, ज्यांना ज्यांना युतीमुळे नुकसान होणार आहे. ते अशा पद्धतीचे वक्तव्य करणारच. युती झाल्यामुळे त्यांच्यासमोर भवितव्याचा मोठा प्रश्न उभा राहिला असेल. त्यामुळे असे ते म्हणणारच, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री आणि ते चांगले मित्र आहेत. ते त्यांना समजावून सांगतील.