सरकारमध्ये सामिल असलेल्या तिन्ही पक्षांना मराठा आरक्षण प्रामाणिकपणे द्यायचं नाहीये. परंतु आपण जर ते दिलं नाही असं केलं तर त्याचे आपल्याला राजकीय तोटे होतील याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतच काही ना काही खोडा घालून ते आरक्षण न देणं किंवा लांबवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी केला.

ज्यांनी आजपर्यंत मराठा आरक्षणात राज्य सरकारची बाजू मांडली, असे निष्णात वकिल जे पूर्वीच्या सरकारनं दिले होते त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आल्याचं भांडारी म्हणाले. तसंच त्यांनी आतापर्यंत नवे वकीलही दिले नाहीत. सुनावणी महत्त्वाच्या आणि अखेरच्या टप्प्यात आली असताना वकिल बदलणं किंवा त्यांना तुम्ही काम करू नका असं सांगणं म्हणजे आपला दावा दुबळा करण्याचा प्रयत्न आहे. तसंच यात निश्चितच कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय येत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांना प्रकाश शेंडगे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. प्रकाश शेंडगे हे फार जाणकार व्यक्ती नाहीत. ते जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी काय काम केलं हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्यांनं घेण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण हा विषय तत्कालिन राज्य सरकारनं दिला आणि लागू केला. परंतु तो निर्णय ज्यांना मान्य नव्हता ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्याबाबत सुनावणी सुरू आहे. धनगर आरक्षणाचीही आमची भूमिका सकारात्मकच होती. तसंच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जी पावलं उचलणं अपेक्षित होतं ती पावलं उचलली. आता शेंडगे यांनी आमच्यावर चिखलफेक करण्यापेक्षा त्यांचं सरकार आलं आहे. त्यामुळे धनगर आरक्षण ताबडतोब लागू करण्यासाठी त्यांनी काम करावं, असं ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे पक्षातील अविभाज्य भाग आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाटा आहे. तर पंकजा मुंडे यांचीही पक्षाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही शंका आणि नाराजी असेल तर ती पक्षाशी चर्चा करून सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आणि पक्षाच्या नेतृत्वात आहे. ते पक्ष सोडून जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असंही ते म्हणाले.