मुंबई : भिन्न राजकीय पक्षांतील लोकांमधील सुसंवाद ही महाराष्ट्राची परंपरा; पण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांवर टीका व आरोपांचे सत्रच सुरू के ले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडूनही तसेच उत्तर येऊ लागल्याने राज्यातील राजकीय वातावरण कडवट झाले असताना एरवी एकमेकांवर जहाल टीका करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपचे प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड हे हास्यविनोदात रमलेले चित्र मंगळवारी दिसले.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गाडीतून विधान भवनाबाहेर पडण्याच्या बेतात असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार प्रसाद लाड व  गिरीश महाजन यांनी ठाकरे यांना अडवले. त्यांचे बोलणे होत असतानाच ठाकरे यांचे स्वीय सहायक व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर पोहोचले आणि साहेब, हे तुम्हाला घेराव घालत होते का, असा मिश्कील सवाल त्यांनी के ला. तसेच यांना गाडीत घालून शिवबंधन बांधून टाकू , असा चिमटाही त्यांनी काढला. त्यावर आम्ही के व्हाही येऊ शकतो हेच आमचे मूळ आहे, असे उत्तर देत आपल्या शिवसेनेच्या दिवसांची आठवण दरेकर यांनी करून देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.