माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केलं जात असून ट्रोल करणाऱ्यांना रोखलं जावं अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे. ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बदनामी कारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे, तसंच अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळांने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा परमबीर सिंह यांच्या भेटीला पोहोचले होते. भाजपा नेत्यांनी यावेळी पोलिसांवर होणारे हल्ले चिंताजनक असून हल्लेखोरांवरही कठोर कारवाई केली जावी असं म्हटलं आहे.

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत असल्याचा आमचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचं राजकारण करतंय का अशी शंका निर्माण होत आहे”.

“काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील हेही आम्ही नम्रपणे सांगितलं,” असल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तात्काळ एफआयआर केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे”. प्रवीण दरेकर यांनी यावेळी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी चिंता व्यक्त केली. “पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ते सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. रोज हल्ले होत असल्याने पोलिसांचं मनोबल खचत आहे. पोलिसांचं खच्चीकरण झालं तर करोनाशी लढणं मुश्कील होईल. त्यांच्या सुरक्षेसाठी टोकाची कठोर कारावई करणं गरजेचं आहे,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.