आपणाशी कोणतीही चर्चा न करता मनसेला ‘महायुतीत’ घेण्याचे जे उद्योग भाजपच्या नेत्यांनी चालवले आहेत, ते तत्काळ बंद करावते, असा सज्जड दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी दिला. बाहेरच्या बाहेर मनसेला डोळे मारण्यापेक्षा भाजप नेत्यांनी आपल्या पक्षात लक्ष घालून पक्षासाठी काम करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. मनसे युतीमध्ये आल्यास सत्तेचे गणित सोपे होईल, असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्या संदर्भात राज बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘राज व उद्धव यांना एकत्र आणणार, मनसेला महायुतीत सामावून घेणार, अशी अनेक विधाने गेले काही महिने भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. यातील एकही नेता आजपर्यंत या विषयावर माझ्याशी ठोस बोललेला नाही. जे काही चालले आहे ते बाहेरच्या बाहेर सुरू आहे. वर्तमानपत्रातून कोणी ‘टाळी’ मागत नसते हे मी यापूर्वीही स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी बाहेरच्या बाहेर डोळे मारणे आणि शूक शूक करणे आता बंद करावे. भाजप मला अस्पृश्य नाही, परंतु माझ्याशी कोणतीही चर्चा करायची नाही आणि परस्पर मनसेला युतीत सामावून घेण्याच्या बातम्या पसरवायच्या हे योग्य नाही.’’ भाजपबद्दल मी परस्पर काही विधाने केली, तर त्यांना ते आवडेल का, असा सवालही त्यांनी केला.
‘‘युतीबाबात जेव्हा माझ्याशी ठोस चर्चा होईल त्यावेळी माझी मते भाजप नेत्यांकडे मांडीन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे समजूतदार नेते आहेत, असे मी मानतो. ‘कृष्णभुवन’वर सदीच्छा भेटीसाठी ते आले होते तेव्हा मी थोडीबहुत मांडलेली मते त्यांना ठाऊक असतील, अशी आशा बाळगतो. चर्चा वर्तमानपत्रातून होत नसते हेही माझे मत त्यांना ठाऊक असावे. ते विसरले असल्यास पुढच्या भेटीत माझे मत पुन्हा मांडीन,’’ असेही राज म्हणाले.
भाजपच्या काही नेत्यांचे जे उद्योग सुरू आहेत त्याची कल्पना मला आहे. काँग्रेस-राष्ट्रावादीच्या पराभव करण्याच्या नावाखाली मनसेला महायुतीत आणण्याच्या प्रयत्नांना यश आले तर ठीकच; अन्यथा पाहा, आम्ही प्रयत्न केले पण यांनाच नको, असे म्हणून आम्हाला बदनाम करायचे, असले खुळचट राजकारण करू नका, अशी विनंतीवजा तंबीही राज यांनी  दिली.