शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असून राज्यभरातून शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनासाठी महापालिकेने स्मृतिस्थळ फुलांनी सजवले आहे, तर पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त रविवारपासूनच लावण्यात आला. शिवाजी पार्कच्या परिसरात भगवे झेंडे तसेच बाळासाहेबांना अभिवादन करणारे फलक मोठय़ा प्रमाणात लावण्यात आले आहेत. रविवारीच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक येथे येऊ लागले. बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून भाजपसह विविध पक्षांचे केंद्रीय व राज्यस्तरीय नेते उपस्थित होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून सेना-भाजपमधील दुरावा वाढतच आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील तसेच केंद्रातील भाजपचे नेते बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यास उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचा पाठिंबा हा सेनेने प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळे शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आदरांजली वाहण्यासाठी येणार का, याविषयीही कुतूहल आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्यासाठी शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि इतर मान्यवरांना स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील संयुक्त महाराष्ट्र दालनासमोरील शिवपुतळय़ाशेजारील प्रवेशद्वारातून प्रवेश करता येईल. तर शिवसैनिक व इतर सर्वाना समर्थ व्यायाम मंदिराकडून दर्शन रांगेतून प्रवेश दिला जाईल.

वाहतुकीचे नियोजन
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनासाठी होणारी गर्दी लक्षात वाहने उभी करण्यास परवानगी असलेले रस्ते –
*सेनापती बापट मार्ग. माहीम ते दादर.
*पाच उद्यान परिसर, माटुंगा.
*लखमशी नप्पू रोड (हिंदू कॉलनी) माटुंगा.
वाहनांना प्रवेशबंदी असलेले रस्ते –
*स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर ते कापड बाजार जंक्शन)
*राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत.
*दिलीप गुप्ते मार्ग, पांडुंरंग नाईक मार्ग येथून दक्षिणकडील मार्गिका.
*गडकरी चौकातून केळुस्कर रोड, दक्षिण व उत्तर.
*दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळय़ापासून गडकरी जंक्शनपर्यंत.
*बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतिदिन सोमवारी आहे. रविवारपासूनच शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी नागरिक येऊ लागले आहेत. (छाया: प्रदीप कोचरेकर)