पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने जनतेला संविधानाचे पावित्र्य राखण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला. मात्र, देशातील जनता घटनेचे पावित्र्य निष्ठेने राखत आहे. मोदींनी आता आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना घटनेचे पावित्र्य राखण्याचा सल्ला द्यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, गेल्या सहा वर्षांतील मोदी सरकारचा कारभार पाहता ते स्वत: आणि भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री संविधानाला हरताळ फासून हुकूमशाही वृत्तीने सरकारे चालवत असल्याचे दिसून येते. मोदी त्यांचे कान पकडत नाहीत, त्यामुळे या सर्वाना त्यांचा मूक पाठिंबा आहे असे दिसते. घटनेच्या पावित्र्याच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात घटनेला सुरुंग लावायचा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीवर मोदींचे वर्तन सुरू आहे, ते आता तरी थांबवणार का, असा सवाल दलवाई यांनी केला.