ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणीबाणी लागू होण्याची शक्यता असल्याचे भाष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लक्ष्य’ केले असताना आता माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. ‘वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले जणू ‘मेंदू मृतप्राय’ (ब्रेन डेड) झाल्याचे २६ मे २०१४ रोजी ठरविले गेले, अशी खरमरीत टिप्पणी सिन्हा यांनी केली आहे. या दिवशी मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यासंदर्भात सिन्हा यांनी जोरदार टोला लगावला आहे.
सिन्हा हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मनमोहन सिंह आणि मोदी यांच्या कारकीर्दीत कोणता फरक आहे, असे विचारता ज्येष्ठांना डावलण्यात आल्याबद्दल आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली.
मंगळवारी एका आर्थिक चर्चासत्रात सिन्हा यांनी हे भाष्य केल्याने खळबळ उडाली आहे.
मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलताना ‘देशाला आधी सुस्थितीत आणण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. मग अन्य बाबी आपोआप होतील,’ असे भाष्य सिन्हा यांनी केले.